Thursday, May 8, 2008

ना सांगताच तू मला उमगते सारे

१.
ना सांगताच तू मला उमगते सारे
कळतात तुलाही मौनातील इशारे
दोघात कशाला मग शब्दांचा बांध
कळण्याचा चाले कळण्याशी संवाद

२.
ही दरी धुक्याचे तळे जणू अनिवार
सांडला केशरी कुंभ उठे झंकार
कोवळ्या तृणांना जणू उन्हाचे डोळे
उमटले कळीवर पाय दवांचे... ओले...

३.
मी तुझ्या घराशी खरेच होतो आलो
थबकलो... जरासा - क्षणात मागे फिरलो
किती दूर पोचलो सर्व तोडुनी धागे
क्षण वळुन पाहिले... तुझा उंबरा मागे

४.
घननीळ रान घननीळ रातीला भिडले
सावळे डोह सावळ्या सावल्या ल्याले
चांदण्यात गोऱ्या भिने निळा अंधार
दूरात दर्वळे सृजनाचा हुंकार

५.
पाऊस किती दिवसांत फिरकला नाही
पाऊस कुणाला कधीच कळला नाही
पाऊस ऋतुचे निमित्त करूनी दिसतो
पाऊस पापणीआड... कधीचा.. असतो

६.
लय एक हुंगिली खोल खोल श्वासांत
ओवीत चाललो शब्दांच्या धाग्यात
लहडला वेल.. तो पहा निघाला गगनी
देठांना फुटल्या कविता पानोपानी

७.
ही लय प्रलयाच्या तांडवात घुमणारी
आकाराच्या देहातुन लवलवणारी
लय विश्चामधला रुणझुणता आभास
मरणाच्या तिमिरी लय - मिणमिणता श्वास

No comments: