Friday, May 2, 2008

उत्सव अन, विस्तव………

आठवतं त्या क्षीतिजावरती?
फ़ुले सावळी उमलत होती..
अन, डोळे तु अलगद मिटता
किरणकळी तुज बिलगत होती..

बंद डोळ्याआड तुझिया
गंध कोवळा बरसत होता..
जणु दिशांच्या कायेवरुनी
रंग सोहळा उतरत होता..

आठवते का ते नभ निळे
रुप तुझ्यास्तव बदलणारे..
इंद्रधनुचे ते दिव्य पिसारे
अन, वक्ष पश्चिमी सजणारे..

तुझ्यासवे मी झेलत होतो
बहरणारा तो ओला उत्सव..
अंतरातली लय तव पुसता
मोहरणारा क्षण तो आठव..

घट्ट मुठीतुनी गतक्षणांच्या
आज ओघळती सये अंतरंग..
मनातल्या हळव्या तळ्यातही
का पाण्याविनाच उठती तरंग?..

आता सावळा रंग बरसता
सये थेबांतुनही येते थरथर..
तुझ्याविना मी जाळत जातो
क्षण हे ओले कातर कातर.

मज सलते खुण स्वप्नांवरची
जणु जखमा सत्य, जखमाच वास्तव..
तुझ्याविना त्या क्षीतीजावरला
विस्तव भासे मज तोच उत्सव..

No comments: